दुष्काळ

समाजामध्ये वावरताना, समाजसेवा म्हणजे नेमक काय? हे सांगता येणार नाही. समाजसेवेची नेमकी व्याख्या करता येणार नाही. कारण समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने समाजसेवेची व्याख्या करत असतो. आपापल्या पद्धतीने सेवा करत असतो. परंतु ‘वात्सल्य’ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना, ज्या समाजात आपण वाढलो, लहानाचे मोठे झालो, त्या समाजाप्रती आपण काही तरी देणं लागतो, या सामाजिक भावनेतून कार्य केले जात आहे. वात्सल्य सामाजिक संस्थेने हाती घेतलेले कार्य खूप मोठे आहे त्यामुळेच या कार्याचा अविरत प्रवास सुरु आहे. 

सध्या वात्सल्य सामाजिक संस्थेकडून काही कामे हाती घेण्यात आलेली आहेत, तर काही कामांवर लक्ष केंद्रित करून त्यांची रूपरेखा आखण्यात आलेली आहे.

दुष्काळ निवारणासाठी शाश्वत प्रयत्न

जेव्हा दुष्काळ पडतो

तेव्हा भेगा जमिनीलाच नाही

तर त्या दुष्काळग्रस्तांच्या काळजाला ही पडतात ।

हे शाश्वत सत्य आहे, आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णकालीन ठोस उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी वात्सल्य सामाजिक संस्था एक माध्यम म्हणून काम करत आहे. 

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यासह मराठवाड्यात सतत पडणाऱ्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता तसेच स्थानिक शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता याविषयावर काम करण्यासाठी वात्सल्य सामाजिक संस्थेने काही शाश्वत उपाय योजना आखण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. भविष्यामध्ये या समस्या उद्भवू नयेत, त्याच बरोबर सामाजिक जागृती देखील व्हावी यासाठी काही ठोस पर्याय उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. यामध्ये, खालील मुद्द्यांवर अधिक भर देण्यात येत आहे.

  • दुष्काळी गावांमधील नाला सरळीकरण, बांधबंधारीकरण, नदी खोलीकरण या विषयावर अधिक भर देणे.
  • दुष्काळी गावांपर्यंत सरकारी योजना तसेच पाण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना पोहोचवणे.
  • दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकांना जागृत करणे.
  • चारा छावण्या तसेच तत्सम माध्यमातून शेतकरी कुटुंबाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे.
  • वृक्ष लागवड करणे, शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व पटवून देणे.

पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वाहत असते. अशा पाण्याचे संधारण आणि व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या जलचक्राचा जमिनीवरील प्रवास या पाणलोटातून होतो, त्यामुळे जर पावसाच्या पाण्यापासून सुरुवात केली, तर निसर्गाचे हे जलचक्र उत्तमप्रकारे कार्य करू शकेल. त्यामुळेच,

‘ 

‘डोंगर दऱ्यांमधून धावणाऱ्या पाण्याला चालायला लावणे, 

जमिनीवरून चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावणे

आणि 

नद्यांमध्ये स्थिरावलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला लावणे

हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वात्सल्य सामाजिक संस्था कार्य करत आहे.

दुष्काळ ही एक प्रासंगिक समस्या आहे, मनुष्य त्यावर मात करू शकतो, परंतु यासाठी ठोस आणि शाश्वत उपाय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सरसावलेले मदतीचे हात, या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणे हे संस्थेचे कर्तव्य आहे.