जेष्ठाश्रम

जेष्ठ नागरिकांसाठी ‘जेष्ठाश्रम’

अवाढव्य लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये सध्या युवकांची सर्वाधिक संख्या आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, आपल्यावर संस्कार केले, आपल्याला घडवले, त्या आपल्या वृद्ध पालकांचा सांभाळ करण्यासाठी काही लोकांकडे वेळ नसतो, अथवा काही कारणास्तव ते जेष्ठांचा सांभाळ करत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये या जेष्ठ आणि अनुभवी लोकांनी जायचे कुठे, हा विचार मनात आल्यानंतर वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, जेष्ठ नागरिकांसाठी एक जेष्ठाश्रम उभे करण्याची संकल्पना समोर आली, त्यानुसार या विषयावर काम सुरु झाले आहे.

वृद्धाश्रम नव्हे ‘जेष्ठाश्रम’

सध्या समाजामध्ये वृद्धाश्रम ही संकल्पना एका वस्तीगृहासारखी नावारूपास आलेली आहे, रूढ झालेली आहे. परंतु असे वृद्धाश्रम उभे न करता, ज्या ठिकाणी जेष्ठांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतील, असे ‘जेष्ठाश्रम’ उभारण्यात यावे, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन वात्सल्य सामाजिक संस्था काम करत आहे. 

सध्या युवकांचा देश म्हणून गणल्या जाणाऱ्या आपल्या देशामध्ये भविष्यात सर्वाधिक वृद्ध असणार आहेत, तसेच आत्ता देखील काही तरुण आपल्या वृद्ध माता पित्यांचा सांभाळ करत नाहीत, अशा सर्व वृद्ध नागरिकांना सन्मानाने जगता यावे, उतार वयात शांततेत आयुष्य घालवता यावे, याकरिता वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ‘जेष्ठाश्रम’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांशी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करून शेवटी या प्रकल्पावर काम सुरु केले आहे.

हा जेष्ठाश्रम नावारूपास यावा, याकरिता वात्सल्य संस्थेकडून उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामध्ये जमीन विकत घेण्यात आलेली आहे. पुढील २ वर्षांमध्ये जेष्ठाश्रमाचे काम पूर्ण करण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जात आहेत.