आम्ही

वात्सल्य सामाजिक संस्था परिचय

आंतरराष्ट्रीय स्तरावर महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करणारा आपला भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात, विविध धर्म पंथाचे लोक राहतात, असे असताना देखील समाजामध्ये एक प्रकारची दरी नेहमीच दिसून येते. काही लोक अधिक श्रीमंत आहेत, तर काहींना एक वेळ जेवण मिळण्याची देखील भ्रांत आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत, यामध्ये अनेक वेळा त्यांना निसर्गाची साथ मिळत नाही. यामध्ये अनेक शेतकरी कुटुंब देखील आहेत. यासाठी सरकार देखील प्रयत्न करते, परंतु हे प्रयत्न अपुरे पडतात किंवा गरजू व्यक्तीपर्यंत वेळेवर पोहोचत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये हा उपेक्षित वर्ग अधिक उपेक्षित होत जातो. अशा उपेक्षित वर्गासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. ही सर्व परिस्थिती ओळखून ‘वात्सल्य सामाजिक संस्था’ स्थापन करण्यात आलेली आहे. 

समाजामध्ये वावरताना आपण ज्या समाजात लहानाचे मोठे झालो, त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, अशी भावना ज्यावेळी निर्माण होते, त्यावेळी ‘वात्सल्य’ सामाजिक संस्थेसारख्या संस्थेची उभारणी होत असते. ‘ही माझी लोकं आहेत, यांचे दुःख दूर झालेच पाहिजेत, ही जाणीव ठेवून ८ फेब्रुवारी २०१६ रोजी वात्सल्य सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काही ठराविक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आजही अविरत प्रयत्न सुरु आहेत. 

सामाजिक कार्ये करणाऱ्या कार्यकर्त्यास समाज भरभरून आशिर्वाद देतो, परंतु त्यासाठी फक्त एक माध्यम म्हणून कार्य करत राहण्याची आवश्यकता असते. याच भावनेतून एक माध्यम म्हणून ‘वात्सल्य’ सामाजिक संस्थेने जन्म घेतला. समाजाच्या सर्व स्तरातील गरजू व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत अनेक छोटे मोठे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे, परंतु यामध्ये सुरुवातीस मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काही कामे हाती घेण्यात आलेली आहेत. 

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन याठिकाणी शाश्वत उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये स्व खर्चातून गो वंश चारा छावणी उभारणे, रामतीर्थ परिसर नळदुर्ग, याठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी ‘स्वच्छतेचा महायज्ञ’ करणे, गरीब शेतकऱ्यांच्या मुलींचे सामुहिक विवाह सोहळे आयोजित करणे, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शाश्वत उपाय योजना करणे असे काही उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. यामध्ये ‘वात्सल्य’ संस्था ही केवळ एक माध्यम आहे. 

सामाजिक कार्यासाठी माध्यम म्हणून कार्य करत असताना एका हाताचे अनेक हात व्हावेत, हे हात एकत्र यावेत आणि गरजू आणि वंचित समुदायास मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वात्सल्य सामाजिक संस्था प्रयत्न करत आहे. 

आमच्याविषयी

सामाजिक कार्य करणारा एक सामान्य कार्यकर्ता स्वतःला समाजाशी ज्या कर्तव्याने बांधून घेतो, ती ‘सामाजिक बांधिलकी’ म्हणजे नेमकं काय? याची जाणीव झाल्यानंतर देखील पुढे काय करायचं? हा एक यक्ष प्रश्न युवा सामाजिक कार्यकर्त्यांना पडलेला असतो. यामधूनच एखाद्या सामाजिक संस्थेची अथवा एका माध्यमाची निर्मिती होते. कारण समाजातील अनेक व्यक्ती, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी विविध प्रकारे कार्य करत असतात. हे कार्य करत असताना ते आपापल्या पातळीवर कार्य करतात. परंतु हेच सामाजिक कार्य एकत्रित पद्धतीने सर्वांनी मिळून केले, तर लागणारा वेळ ही कमी लागतो आणि आपल्याला अधिकाधिक वंचित आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचणे देखील सोपे जाते. कारण एक माध्यम म्हणून, हे एकीचे सामर्थ्य असते. याच भावनेतून नावारूपास आलेल्या ‘वात्सल्य’ सामाजिक संस्थेने, गरजू आणि वंचित समाजापर्यंत एक माध्यम बनून जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. यामध्ये समाजातील काही सुजाण नागरिकांचा या कार्यास हातभार लागत आहे.